कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने तास घेतले जात आहेत. परंतु, मागील वर्षाची फी भरली नसल्याने ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांना लिंक न पाठवून त्यांना वर्गात बसू न देण्याची प्रकरणे समोर आली आहेत. तसेच शाळेच्या फीचा तगादा लावून पालकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शाळेच्या फी मध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, अशी मागणी आमआदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सर्व शाळांनी आपल्या मागील वर्षीच्या खर्चाचे ऑडिट करून अतिरिक्त जमा रकमेचा परतावा पालकांना करावा, असे आदेश शिक्षण विभागाने द्यावेत, शालेय वर्षाचा कार्यकाल आणि अभ्यासक्रम ठरल्यानंतरच पालक-शिक्षक कार्यकारी समिती तयार करून त्यांची मान्यता घेतल्यावरच नवीन शालेय वर्षाची फी आकारावी. विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढणे, पालकांना फी भरण्यास मुदतवाढ न देता मानसिक त्रास देणे असे प्रकार शाळांनी करू नयेत. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सक्त सूचना द्याव्यात अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपच्या वतीने देण्यात आला.

यावेळी आपचे प.म. अध्यक्ष संदीप देसाई, युवाध्यक्ष उत्तम पाटील, अॅड. किरणसिंह शिलेदार, पालक प्रतिनिधी सचिन डाफळे, दिलीप पाटील, विशाल वठारे, बसवराज हदीमनी आदी उपस्थित होते.