कुरुंदवाड (प्रतिनिधी) : हेरवाड ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावात राजकीय वातावरण तापले आहे. अशातच गावातील अनेक इच्छूक पदाधिकार्‍यांनी नविन आघाड्यांची घोषणा केली. मात्र, कालांतराने ती हवेत विरल्यामुळे सत्ताधारी विरुध्द दिलीप पाटील आणि वसंतराव देसाई अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन बलाढ्य आघाड्यांत ही निवडणूक रंगणार असल्याने यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चेबंधणी करण्यात आली आहे.

हेरवाड ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणूकीसाठी चार पॅनेलच्या माध्यमातून चौरंगी लढत आपल्याला पहायला मिळाली होती. यानंतर आर.बी.पाटील गटाला जनतेने कौल दिला आणि सत्ताधारी म्हणून त्यांनी पाच वर्षे कारभार पाहिला. या पाच वर्षातील विकास कामे आणि संपूर्ण देशात आदर्श निर्माण केलेला विधवा प्रथा बंदीबाबचा निर्णय यामुळे हेरवाडचे नांव देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहचविले, त्यामुळे सत्ताधारी गट सध्या तरी विकास कामाबरोबर हा मुद्दा घेवून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहे. तर विरोधी गटाकडून न झालेली विकासकामे, विधवा महिलांसाठी न केलेली कामे हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात दोन्ही गटाकडील नाराज गट एकमेकाच्या गोटात सामील झाले. यामध्ये विरोधी गटाचे पक्षप्रतोद सुकूमार पाटील यांनी थेट सत्ताधारी गटात सामील झाल्याने विरोधी गटाला मोठी खिंडार पडल्याचे चित्र आहे. तसेच मागील पंचवार्षिक निवडणूकीत किंगमेकरची भूमिका बजावलेल्या एकता ग्रुपने पुन्हा सत्ताधारी गटाला साथ दिल्याने सत्ताधारी गटाचे पारडे पुन्हा जड झाले आहे. दरम्यान, सत्ताधारी गटातील सुधीर माळी, सुनिल माळी, देवगोंडा आलासे, पायगोंडा आलासे ही मंडळी विरोधी गोटात सामील झाल्याने सत्ताधार्‍यांनाही धक्का बसला. त्यानंतर वसंतराव देसाई यांनीही विरोधी म्हणजेच दिलीप पाटील यांच्याबरोबर हातमिळवणी केल्यामुळे एकंदरीत दुरंगी लढतीचे चित्र सध्या हेरवाडमध्ये पहायला मिळत आहे.

सत्ताधारी आर.बी. पाटील यांच्या गटाकडून जीवन कांबळे यांच्या पत्नी तृप्ती कांबळे यांचे नांव जाहीर करण्यात आले आहे. तर विरोधी दिलीप पाटील व वसंतराव देसाई यांच्या गटाकडून अर्जुन जाधव यांच्या पत्नी रेखा जाधव यांचे नांव जाहीर करण्यात आले आहे. तसेच अपक्ष उमेदवरांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.

एकंदरीतच दोन्ही गटाकडून साम, दाम, दंड, भेदाचा वापर होण्याची शक्यता असून कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळविण्यासाठी प्रभागामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे.