‘गोकुळ’ निवडणुकीचा राधानगरी तालुक्यात फिव्हर : इच्छुकांची भाऊगर्दी

0
641

राशिवडे (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.  सत्ताधारी गट व विरोधी गटातील इच्छुक उमेदवारांनी ठराव धारकांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हासह राधानगरी तालुक्यात इलेक्शन फिव्हर चढू लागला आहे. तालुक्यात दोन विद्यमान संचालक आहेत. त्यापैकी अरुण डोंगळे यांनी अगोदरच सत्ताधाऱ्यांच्या अनेक निर्णयाविरोधात जाहीर विरोध दर्शवत मी जनतेसोबत म्हणत विरोधी गटाच्या महाविकास आघाडीत डेरेदाखल झाले आहेत. तर दुसरे विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे.

महाविकास आघाडीच्या एकसंधतेमुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसून येत आहे. तर सत्ताधारी गटांकडून फारसे कोणी इच्छुक दिसत नाहीत. भौगलिकदृष्ट्या राधानगरी तालुका हा भोगावती, तुळशी आणि दूधगंगा या तीन खोऱ्यात विभागला आहे. मध्यंतरी तुळशी खोऱ्यातून आम्ही भोगावती खोऱ्यातील इच्छुकांना पाठिंबा देणार नाही, अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेज व्हायरल होत होते. पण जसजसे निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे, तसे पाठिंबा मिळण्यासाठी अनेक जण धडपडताना दिसत आहेत. आमदार प्रकाश आबिटकर हेदेखील सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील होण्याची शक्यता आहे. कारण गोकुळ वगळता इतर ठिकाणी लढताना त्यांच्या गटाला येणाऱ्या अडचणी पाहता ते दूरगामी विचार करतील. महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीकडे आबिटकर यांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर ते विरोधी गटापासून फारकत घेतील, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली होती.  

अभिजित तायशेटे, प्रा.किसन चौगले, सदाशिव चारापले, विजयसिंह मोरे, जीवन पाटील यांच्याबरोबरच अनेकजण गोकुळ संचालक होण्यासाठी इच्छुक आहेत. पण विरोधी राजर्षी शाहू आघाडी कशी आकार घेते, यावरच इथली सारी गणिते अवलंबून आहेत. पण तालुक्याचा विचार करता अरुण डोंगळे यांच्यासारखा मातब्बर  संचालक विरोधी आघाडीस मिळाल्यामुळे विरोधकांची निश्चितपणे ताकद वाढली आहे. त्यामुळे डोंगळेंच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी चाचपणी सुरू केली असून डोंगळे घराण्यातच उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.