राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील आवळी आमजाई व्हरवडे दरम्यान अंबाबाई मंदिराजवळ स्त्री-भ्रूण तपासणी करणारे मशीन घेऊन जाताना दोघांना पोलीसांनी काल (शुक्रवार) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक मोटरसायकल आणि गर्भलिंग तपासणी करणारे मशीन पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, या दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी सापडलेले मशीन रस्त्यावर फोडले. तरी पण अद्याप कोणावरच कारवाई झाली नसल्याने नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यात उघडपणे गर्भलिंग तपासण्या होत असताना जिल्हा अधिकार्यांनी नेमलेल्या पथक करते तरी काय असा सवाल महिला वर्गातून विचारला जात आहे. तर पोलीस निरीक्षक उदय डूबल यांच्या पथकाने त्यांच्याकडून एक मोटरसायकल आणि गर्भलिंग तपासणी करणारे मशीन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

‘लेक वाचवा देश वाचवा’ अस अभियान संपूर्ण देशात राबवल जात आहे. यावर शासन कोट्यावधी रुपय खर्च करत आहे. तरीही या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. काल (शुक्रवार) संध्याकाळी राधानगरी येथील गैबी ते परिते राज्य मार्गावरून आवळी आमजाई-व्हरवडे दरम्यान अंबाबाई मंदिराजवळ गर्भलिंग तपासणी करणारे मशीन घेऊन जाताना सुजित सात्तापा मोहिते (रा. शिवगंगा कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, सध्या राहणार नरतवडे) आणि अजित दत्तात्रय चौगुले राहणार (रा. नरतवडे) यांना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले आहे.

मात्र, या दोघांनी हे मशीन पुरावा नष्ट करण्यासाठी रस्त्यावर आपटले असल्याचे पोलीस निरीक्षक डुबल यांनी सांगितले. राधानगरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अभियंते डॉ. जी.बी.गवळी यांना पोलिसांना बोलावून घेतले असता हे मशीन सोनोग्राफी करण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यातील स्त्रीभून हत्या करणारा मुख्य सुत्रधारावर आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर जिल्हाधिकारी कोणती कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या राधानगरी तालुक्यात एक हजार मुलांच्या मागे नऊशे एक मुलींचा जन्मदर आहे साधारण नव्याण्णव मुलींची संख्या आजही कमी आहे. तरीही निर्दयीपणे गर्भातच अनेक मुलींना मारले जाते, असे स्प्ष्ट झाले आहे. त्यामुळे हे थांबणार तरी कधी ? या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी आर.आर. शेट्टी यांना विचारले असता, ही गंभीर बाब आहे अशा लोकांच्यावर कठोर कार्यवाही होणे गरजेचे असून तालुक्यात ४३ बोगस डॉक्टर असून चार बोगस डॉक्टरांच्यावर कार्यवाही केली आहे तर सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांना बोगस डॉक्टरांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आज पोलिसांनी विनापरवाना गर्भलिंग तपासणारे मशीन ताब्यात घेतले आहे. मात्र, शनिवारी संध्याकाळपर्यंत या प्रकरणी कोणावरच कारवाई केली नाही. आता जिल्हाधिकारी आणि आरोग्ययंत्रणा यावर कोणती कार्यवाही करणार की हे प्रकरण नेहमी प्रमाणेच मिटवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कारवाईत पोलीस हवालदार के. डी. लोकरे, संदीप ढेकळे, संदीप म्हसवेकर, सुरेश मेटील, कृष्णात यादव यांनी सहभाग घेतला.