कुरुंदवाड (कुलदीप कुंभार) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतच गावा-गावातील राजकारण तापू लागले आहे. यामुळे इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.मात्र, हेरवाड येथील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी इच्छूकांना अतिक्रमण नसल्याबाबतचा दाखला जोडण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे इच्छूक अतिक्रमणधारक असणाऱ्या उमेदवारांची धावपळ सुरु झाली. सध्या अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे एखादा अतिक्रमणधारक उमेदवार निवडून आला तरीही त्याचे पद अधांतरीच राहणार असल्याचे शिरोळ तालुक्यातील कायदे तज्ञांनी आपले मत व्यक्त केले.

शिरोळ तालुक्यात एकुण ५,१७४ अतिक्रमणधारक असून सध्या न्यायालयाच्या आदेशाने सर्व अतिक्रमण निष्कालित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होताना दिसत आहेत. अशातच शिरोळ तालुका सर्वपक्षीय अतिक्रमण संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढला गेला. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढार्‍यांनी अतिक्रमणधारकांची एक विटही हालू देणार नसल्यची ग्वाही दिली.

मात्र, शिरोळ तालुक्यातील कवठेसार, उमळवाड, संभाजीपुर, चिंचवाड, कनवाड, हरोली, टाकवडे, अब्दुललाट, शिवनाकवाडी, लाटवाडी, हेरवाड, आकिवाट, औरवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, नवे दानवाड या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यातच  निवडणूक विभागाकडून अतिक्रमण नसल्याबाबतचा दाखला जोडण्याचे आदेश आल्यामुळे इच्छूक उमेदरांची तारंबळा उडाली आहे. काही इच्छुकांनी हा दाखला न जोडताच आपले अर्ज दाखल केले आहेत.

सध्या अतिक्रमणाचा प्रश्न ताजा असतानाच कोणत्याही क्षणी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशातच अतिक्रमण नसल्याचा दाखला सादर करण्याचा प्रश्न समोर आल्यामुळे इच्छूकांची मोठी गोची झाली आहे. याचा परिणाम शिरोळ तालुक्यातील मात्तबर राजकीय पुढार्‍यांवर होणार आहे. तरी देखील अतिक्रमण भागातील उमेदवार उभा राहिला आणि निवडून आला तर त्याचे भवितव्य अधांतरीच राहणार आहे हे मात्र, नक्की…