जळगाव : ‘मला माझ्या लेकीची फार आठवण येते. मला तिच्याकडून काहीही नको. तिने फक्त एकदा येऊन मला भेटावे. माझ्याशी दोन शब्द बोलावेत, अशी इच्छा गौतमीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. गौतमी पाटीलचे वडील रवींद्र नेरपगारे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भावनिक सादघातली आहे. गौतमीचे वडील जळगावात राहतात.
ठसकेदार लावणी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाक नेहमीच राडे होताना दिसतात. गौतमी आजवर तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आडनावावरून वाद पेटला होता. अशात आता गौतमीच्या वडिलांमुळे ती चर्चेत आली आहे.
प्रत्येक मुलीचे आपल्या वडिलांशी एक वेगळे आणि अनोखे असे नातं असते. गौतमी सध्या तिच्या आईसोबत राहते. तिचे आई-बाबा विभक्त झाले आहेत. त्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून आईसोबतच राहत आहे. असे असले तरी गौतमी तिच्या आडनावामुळे वादात सापडल्यावर वडिलांनी माध्यमांसमोर येत लेकीला भावनिक साद घातली आहे.
बाबांचा हा व्हिडिओ समोर आल्यावर गौतमीच्या खासगी आयुष्याविषयी आणखीनच चर्चा रंगू लागली. ती आपल्या बाबांना केव्हा भेटणार या प्रश्नाचे तिने स्वत: उत्तर दिले आहे. आपल्या प्रतिक्रियेत तिने म्हटले आहे की, हा माझा कौटुंबिक प्रश्न आहे. यावर मी आता काहीच बोलू शकत नाही. गौतमीविषयी बोलताना तिचे वडील म्हणाले की, मला गौतमीचा फार अभिमान वाटतो. ती आणि तिची आई आम्ही पुन्हा एकत्र राहू. गौतमीचे आडनाव पाटीलच आहे. त्यामुळे ती हेच आडनाव लावणार, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.
गौतमी पाटील ही मुळची जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वेळादे येथील रहिवासी आहे. या गावात तिचे वडील रवींद्र बाबूराव नेरपगारे हे एकटेच राहतात. गौतमीच्या वडिलांचे पत्र्याचे घर आहे. घरची गरिबी असल्यने ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गौतमीच्या वडिलांना दारूचे व्यसन असून, त्यामुळेच घरात पती-पत्नीचे सतत भांडण व्हायची. या त्रासाला कंटाळून गौतमीच्या आईने गाव सोडले व ती मुलीसह पुण्यात राहू लागली. नंतर गौतमीचे शिक्षण मामाने केले.