पुणे (प्रतिनिधी) : कोरोनावरील लस कधी येणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. केंद्र सरकारने लसीचे वितरण करण्याचे नियोजन सुरू केले आहे. तर पुण्यातील सिरम इन्सिट्यूट मध्ये लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. याचा आढावा घेण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी ९८ देशांच्या राजदूतासह २७ नोव्हेंबर रोजी  पुण्यात येणार असल्याची माहिती समोर आली  आहे.

पंतप्रधान मोदी कोरोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे.  याबाबत प्रशासनाची बैठक झाली असून केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु  पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, सिरम इन्सिट्यूटचे अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविडशिल्ड लसीचे १० कोटी डोस तयार असतील, अशी माहिती दिली आहे. काही ठराविक परिस्थितींमध्ये कोविडशिल्ड लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मोदी यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.