धामोड (सतिश जाधव) : काल करवीर तालुक्यातील भोगमवाडी येथील अमित अशोक भोगम आणि आदर्श बाजीराव भोगम या दोन लहान मुलांचा अचानक पाय घसरुन शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाला. यासाठी कृषी विभाग आणि स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाने विशेष लक्ष देऊन जिथे जिथे शेततळी आहेत तिथे तळ्याच्या सभोवताली लोखंडी अथवा लाकडी कंपाऊंड मारणे सक्तीचे करावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण गावेच बंद असल्याने लहान मुलांना बाहेर फिरण्यासाठी काहीच मार्ग उरला नव्हता. परंतु, आता लॉकडाऊन उठला आहे. तसेच वाढत्या उन्हाळ्यामुळे दुपारच्या वेळी ही लहान मुले नदी, विहीर, तलाव, अथवा तळ्याकडे पोहण्यासाठी जातात. यामध्ये पोहता येणारी मोजकीच मुले असतात पण पोहता न येणाऱ्या लहान मुलांचाच भरणा अधिक असतो. त्यातच मागील आठवड्यात राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे विघ्नेश हरी चौगले या तिसरीत शिकणाऱ्या मुलाचा पोहता न आल्यामुळे बुड़ून मृत्यू झाला. तसेच काल भोगमवाडी येथे शेततळ्यात पडून दोन चिमुरड्यांचा अंत झाला.

यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पोहता न येणारी लहान मुले मोठ्या मुलांच्याबरोबर पोहायला जातात आणि अपघात घडतात. त्यामुळे आता भागातील शेततळ्यांना कंपाऊंड करावीत, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.