मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आधीच अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा संकटाच्या छायेखाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

५ फेब्रुवारीपासून उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात ५ ते ११ फेब्रुवारी दरम्यान, कोकणात पावसाळी वातावरण निर्माण होईल. त्यामुळे शेतीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. आंबा, काजू, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.