नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला  लागणार : सत्यजीत पाटील

0
112

सावरवाडी (प्रतिनिधी) :  केंद्र शासनाने नव्याने केलेल्या कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी चळवळ उभी केली पाहीजे. नव्या कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार असल्याची टीका कॉग्रेसचे नेते आणि गोकूळ दुध संघाचे संचालक सत्यजीत पाटील यांनी केली. ते कसबा बीड येथे शेतकरी संघर्ष जनजागरणच्या सभेत बोलत होते. 

यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेवराव गावडे म्हणाले, देशातील बहुराष्ट्रीय कंपन्याच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे. राज्यसभेत बहुमत नसताना नवे तीन कृषी कायदे मंजूर करून देशातील शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा कुटील डाव शेतकऱ्यांनी मोडून काढावा.

करवीर पं. स.चे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले,  देशात शेती व्यवसायासमोर प्रचंड अडचणी येऊ लागल्या आहेत. जगाचा पोषींदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी उपसरपंच दिनकर गावडे, बाबा ढेरे, बाबासाहेब बाबर, कॉ. दिनकर सुर्यवंशी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.