कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यात भर दुपारी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे भात कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांची आज (मंगळवार) एकच तारांबळ उडाली.  काही ठिकाणी काढलेले भात भिजले, तर काही ठिकाणी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

आज सकाळपासून उष्णता वाढली होती. ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे दुपारी  पावसाच्या जोरदार सळी कोसळू लागल्या.  अचानक आलेल्या पावसामुळे भात काढणीत व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्यांची त्रेधातीरपीट उडाली. काढलेले भात झाकून ठेवताना शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर उभे पीक रानात अडवे झाल्याने मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना भिजतच घर गाठावे लागले. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.