टोप (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध (गोकुळ) संघाच्या सेवा सुविधांचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी म्हैशींच्या दुधाचे उत्पादन वाढवावे. असे आवाहन चेअरमन रवींद्र आपटे यांनी केले. ते ताराबाई पार्क येथील बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, उदयसिंह पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गोकुळ श्री स्पर्धा, जिल्हास्तरीय उत्तम प्रत, तालुकास्तरीय उत्तम प्रत, म्हैशींच्या जास्तीचा दूध पुरवठा आणि महिलांच्या संस्थाना बक्षीस वितरण करण्यात आले.

रविंद्र आपटे म्हणाले की, जिल्हा दूध संघाच्या अनेक योजना उत्पादक शेतकरी यांना नवसंजीवनी देणारे आहेत. यामध्ये विशेषत वासरू संगोपन योजना ही अत्यंत प्रभावी असून जातिवंत जनावरांची पैदास आपल्या गोठ्यामध्ये करून म्हैशींच्या दुधाचा जास्तीत जास्त दुध पुरवठा करून संघाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघ नेहमी उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. महापूर आणि कोरोनाच्या महासंकटामध्ये दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधी, गोकुळचे प्रशासन,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच गोकुळची गुणवत्ता वाढीला लागण्यासाठी गोकुळच्या विविध स्पर्धेमध्ये सर्वांचा सहभाग असावा, असे सांगितले.

कार्यकारी संचालक घाणेकर यांनी गोकुळ संघाच्या सेवासुविधा या राज्यात नाहीतर देशात अग्रस्थानी आहेत. या सेवा सुविधांच्या आधारे हातकणंगले  तालुक्यात परिवर्तन घडले आहे. अन्य संघाचा येथे मोठा पगडा  होता. पण सध्या या तालुक्यात गोकुळ दूध संघाला मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होत असल्याचे सांगितले. .

यावेळी माणगाव येथील दूध उत्पादक अनिल मगदूम यांची गाय दूध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच जिजामाता महिला, मंगोबा (घुणकी), हनुमान (लाटवडे), दत्त (तळंदगे),   गोकुळ (इंगळी), कृष्ण (रांगोळी), किसान (रुई) आदी संस्थांना बक्षीस देवून गौरविण्यात आले.

यावेळी दूध संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, उप व्यवस्थापक डी. डी. पाटील, बी. आर. पाटील, प्रताप पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे यांच्यासह तालुक्यातील संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी आणि सचिव उपस्थित होते.