कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (शनिवार) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली.

केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यानं शेतकरी अडचणीत येणार आहेत. हे कायदे शेतकरी हिताचे नसून उद्योजकांच्या हिताचे आहेत, असा आरोप करत या कायद्यांविरोधात अनेक दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (शनिवार) शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. या वेळी निदर्शनंही करण्यात आली. शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, दिल्ली येथील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा, शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीटपट भाव मिळाला पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष व्यंकाप्पा भोसले, उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, सरचिटणीस गणपतराव कांबळे, बी. एस. पाटील यांच्यासह शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या.