गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना काही तांत्रिक अडचणीमुळे २०२२-२३ चा गळीत हंगाम बंद राहणार आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास दहा लाख टन ऊस उपलब्ध आहे. या ऊस उत्पादनामधील सुमारे ९० टक्के ऊस उत्पादक शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. तर ५० टनापेक्षा जास्त पिकविणारे शेतकरी हे कमी आहेत.

गडहिंग्लज कारखान्याच्या बाजूला असणारे कारखाने सध्या लांबून वाहतूक करून कर्नाटकातून अत्यंत कमी रिकव्हरीचा ऊस आणण्याला प्राधान्य देत आहेत. तरी हा विषय गडहिंग्लज कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बनला आहे. त्यामुळे   त्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी जावा, यासाठी तातडीची बैठक घ्यावी. असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.