कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिये येथील गायरानातील गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून शासकीय जागेवर अतिक्रमण सुरू आहे. मात्र तहसीलदारांसह महसूल प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. या वेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुरूम विस्कटताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट होऊन पोलिसांनी मुरुम काढून घेतला. त्यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनास सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. शिये येथील गायरान जमिनीतील गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, शियेतील पूरग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

या आंदोलनात उत्तम पाटील, बाबासाहेब गोसावी, के. बी. खुटाळे, धनाजी चौगले, युवराज राऊत,  डॉ. प्रगती चव्हाण, विनोद कुसाळे, देवदास लाडगावकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.