जाचक अटींमुळे भरपाई मिळविताना शेतकरी हवालदिल…  

0
143

रांगोळी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याला २०१९ नंतर पुन्हा एकदा यंदा अतिवृष्टी आणि महापूराचा मोठा फटका बसला. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच सरकारकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकरी हवालदिल झाला आहे. पंचनामा करण्यासाठी शासनाने लावलेल्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना स्मार्ट फोनवरती नोटकँम कँमेऱ्याने आपल्या क्षेत्रामध्ये राहून फोटो काढणे, लोकेशन चालू ठेवणे, आपली क्षेत्राची पूर्ण माहिती भरणे, अशा अनेक बाबी सांगितल्या आहेत. पण महापूरचे पाणी अजूनही शेतातून हटलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात फोटो काढण्यासाठी जाणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. महिला शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होऊ लागला आहे.

शेतकऱ्यांची सोसायटी भागली पाहिजे, नाहीतर व्याजावर पुन्हा व्याज भरावे लागणार आहे. त्यातच शेतात पीक नसल्याने शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यासाठी लादलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी शेतकरी वर्गांतून होऊ लागली आहे.