धामोड (प्रतिनिधी) : गेल्या आठ दिवसांपासून पुष्य नक्षत्रात पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. अनिश्चित पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अगोदरच मृग नक्षत्रात पाऊस न झाल्यामुळे भात रोप लावणीची कामे लांबणीवर पडली होती. जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर आठ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. ग्रामीण भागात यंदा भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन या पिकाच्या सरासरी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा आला तरी अजूनही काही ठिकाणी भात आणि नाचणीचे तरवे शेतामध्ये पाहावयास मिळत आहेत. ऊस शेती नसणाऱ्या भागात निव्वळ भात शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी अगोदर लावलेली रोपे उन्हामुळे वाळू लागली आहेत. पावसाने अशीच ओढ धरली तर भात, भुईमूग, सोयाबीन ही पिके हाती लागणे कठीण आहे.