शेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम

0
358

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने पारित केलेल्या नवी कृषी विधेयकाच्या कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन आणखीनच तीव्र होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन कायद्यात काही कमतरता असेल तर सरकार चर्चेसाठी तयार आहे. शेतकरी संघटनांनी खुल्या मनाने चर्चेसाठी यावं असं आवाहन केलं. मात्र शेतकरी संघटनांनी सरकारचं हे आवाहन धुडकावून लावलं आहे. सरकारने पुढाकार घेतला नाही तर आम्ही देशभर चक्का जाम करतील असा इशारा संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग यांनी दिला आहे.

सरकार कायद्यात काही बदल करण्यास तयार आहे. मात्र कायदाच रद्द करा अशी भूमिका असू शकत नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांपासून मुक्त करू इच्छिते असे मंत्री तोमर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र शेतकऱ्यांना हे मान्य नाही. सरकार अजूनही आमच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. सरकारने आपली ताठर भूमिका सोडावी, अन्यथा आम्ही आता देशभरात सर्व रेल्वे मार्गावर चक्का जाम करू. या आंदोलनाचा दिवस लवकरच ठरविण्यात येईल, असा इशारा बुटा सिंग यांनी दिलाय.