टोप (प्रतिनिधी) : राज्यात अतिवृष्टीची जबर किंमत शेतकऱ्याला मोजावी लागली आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून त्याना नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर ५० हजार रूपये मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने योग्य ते पॅकेज जाहीर करून नुकसान भरपाई त्याच्या बँक खात्यात वर्ग करावी अशी मागणी समरजीतसिंह घाटगे यांनी शिरोली येथील भात पिकांच्या नुकसान पहाणी दरम्यान केली.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, मागील वर्षी फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई म्हणून दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्गही केले होते. त्यावेळी सध्याच्या सरकारच्या काही नेते मंडळींनी यावर आक्षेप घेत फडणवीस सरकारवर हे पॅकेज तटपुंजी असल्याचे बोलत निशाना साधला होता. पण सध्या सरकार आपले असून आपण वीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, असा टोला घाटगे यांनी कुणाचे नाव न घेता लागावला.

प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना मार्चमध्ये जाहीर केलेल्या महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना पन्नास हजार अद्यापही मिळाले नाही. तर मागील सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे पॅकेज जाहीर केले त्यामधील पैसे काही शेतकरी बांधवांना मिळाले नाहीत. वीज बील दरवाढ ऊर्जामंत्र्यानी तीन महिन्याच्या संघटीत बीलांना कमी करू अशी घोषणा केली होती. त्यानुसार सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. पीक काढण्यासाठी पंधरा हजार रूपयांचा खर्च प्रति एकर येतो त्यानुसार सरकारने राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना योग्य पॅकेजची घोषणा करत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करावेत, असे मत घाटगे यांनी व्यक्त केले.

यावेळी जि.प. माजी अध्यक्षा शौमिका महाडीक,  जि.प. सदस्य अशोक माने, पं.स. सदस्य डॉ. सौ. सोनाली पाटील, अजिंक्य इंगवले, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, वडगाव बाजार समितीचे माजी चेअरमन सुरेश पाटील, कृष्णात खवरे ,बबनराव संकपाळ , डॉ. सुभाष पाटील आदी उपस्थित होते.