‘त्या’ वेळी पवारांचे पाय चाटायला कोण गेले होते ?

राजू शेट्टींनी आशिष शेलारांचा घेतला समाचार

0
361

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सत्तासुंदरी हातातून निसटल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. शेलारांच्या ध्यानी-मनी फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता एवढेच दिसत आहे. आम्हाला कोणाचे तुणतुणे वाजवायची सवय नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे पाय चाटायला कोण गेले होते, याचे उत्तर आधी द्यावे, अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचा समाचार घेतला.

आज (गुरुवार) येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभप्रसंगी आशिष शेलार यांनी राजू शेट्टी यांच्यावर कठोर भाषेत टीका केली. ते म्हणाले की, विधान परिषदेवर निवड व्हावी, या हेतूने शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी आता अडत-दलालांसाठी महाविकास आघाडीचे तुणतुणे घेऊन उभे आहेत. त्यांनी आता वकिली सुरू केली आहे. सत्तरच्या दशकात ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट गाजला होता. या चित्रपटात मोहापायी एका आदर्श शिक्षकावर तमाशाच्या फडात तुणतुणे घेऊन उभे राहण्याची वेळ येते. तशी अवस्था शेट्टी यांची आता झाली आहे.

यावरून राजू शेट्टी यांनी आशिष शेलार यांना खरमरीत भाषेत सुनावले आहे. ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणून रस्त्यावरची लढाई करत आहोत. शेतकऱ्यांची जमीन नव्या कृषी कायद्यांत जाऊ नये म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. आजच उत्तर प्रदेशमधील वृत्तपत्रात बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घरात दोन जनावरे आहेत. त्यांना अतिरिक्त वीज बिल आकारण्यात येणार आहे. हेच भाजपचे सरकार करत आले आहे. यावर आशिष शेलार गप्प का आहेत ?