‘या’ शेतकऱ्याने मागितली चक्क गांजा लागवडीची परवानगी

0
307

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  शेतमालाला हमीभाव मिळत नाही. शेती परवडत नाही. ऊस लावला तर पाण्याअभावी वाळून जातो, नाहीतर बिले मिळत नाही आणि हात रिकामा राहतो. कोणतेही पीक घेतले तरी बाजारात त्याला दर मिळेलच याची शाश्वती नाही. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील  शिरापुर  ( ता. मोहोळ) येथील  अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात  गांजाची लागवड करण्याची परवानगी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.

मसाल्याच्या पदार्थातील खसखस हा एक महत्त्वाचा पदार्थ. किराणा मालाच्या दुकानात तो सहज मिळतो.   पण याच खसखशीपासून गांजा हा नशीला पदार्थ तयार होतो. म्हणूनच  खसखशीची झाडे लावण्यास आपल्याकडे बंदी आहे. कारण त्याला खसखशीची झाडे म्हणतच नाहीत. याला म्हणतात गांजाची झाडे.

शिरपूर गावातील अनिल पाटील या  शेतकऱ्याने आपल्या मालकीच्या २ एकर जागेत थेट गांजाची झाड लागवड करण्याची परवानगी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली आहे. त्यासाठी रीतसर पत्र देऊन त्याची पोच घेतली आहे. त्याची एक प्रत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात   दिली आहे. यामध्ये त्याने कोणत्याही पिकाला शासनाचा हमीभाव मिळत नाही. शेती तोट्यात करावी लागते. पण गांजाला  मात्र चांगला भाव मिळतो. म्हणूनच गांजाची  लागवड करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच १५  सप्टेंबरपर्यंत लेखी परवानगी दयावी. अन्यथा मी  १६ सप्टेंबर  या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली, असे गृहित धरुन मी लागवड सुरु करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला. तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असेही म्हटले आहे.

गांजाचा लागवडीला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे अशी जिल्हाधिकारी परवानगी देणे शक्यच नाही. पण यातून न परवडणारी शेती, हमीभाव यामुळे शेतकऱ्यांची होणारी हतबलता मात्र स्पष्ट होत आहे.