पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांची नुकतीच बदली गडहिंग्लज नगरपरिषद येथे झाल्याने त्यांना एका समारंभात निरोप देण्यात आला.

खारगे यांची बदली झाल्याने पन्हाळा नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार जिल्हाधिकाऱ्यांनी हुपरीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवला होता. निरोप समारंभप्रसंगी माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल, पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, तेजस्विनी गुरव, रवींद्र धडेल, बंडा पाटील, राजू सोरटे, नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नगररचना सहायक अंशुमन गायकवाड यांनी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या विकासकामांचा आढावा घेतला.

खारगे यांनी दोन वर्षांमध्ये पन्हाळगड येथे सेल्फी पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर आणि पन्हाळा क्लब नूतनीकरण, शिवतीर्थ उद्यान, नवीन पाणीपुरवठा योजना, मैला उपसा वाहन, पर्यटनवाढीसाठी शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता आदी विकासकामे केली आहेत. अधिकारी मुकुल चव्हाण, अजित चौरे, नंदू कांबळे, विश्वास रामाणे, सुहास भोसले आणि सफाई कर्मचारी महेंद्र चोपडे यांनी मनोगत व्यक्त केले.

पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी नगरपरिषद प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील चांगल्या समन्वयामुळे पन्हाळा शहराचा जलदगतीने विकास झाल्याचे सांगितले. माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनामुळे पन्हाळा नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ मध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक, तर माझी वसुंधरा-२ अभियानमध्ये पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याचे सांगितले.

मुख्याधिकारी खारगे म्हणाले, नवी मुंबई, मुंबई, पुणे या सारख्या महानगरांनी केलेल्या नावीन्यपूर्ण कामांचा प्रयोग पन्हाळा शहरात करताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी चांगले सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक अमित माने यांनी केले.