मुंबई  (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी  भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रसिद्ध अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची आज (मंगळवार) त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  याआधीही  या उभयतांची लखनऊ येथे भेट झाली होती. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी  भाजप एका वलयांकित  चेहऱ्याचा  शोध घेत आहे. त्यातच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबई येथे मिथुन चक्रवर्ती यांची घेतलेली  भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. लखनऊ येथे झालेल्या भेटीत मी भागवतांना मुंबईला आल्यास आवर्जून माझ्या घरी येण्याचे आग्रहाने सांगितले  होते.  त्याच आग्रहाचा मान ठेवत भागवत यांनी माझी भेट घेतल्याचे मिथुन यांनी सांगितले.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून मिथून यांनी राज्यसभेत खासदार म्हणून काम केले आहे. त्यांचा अनुभवाचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळू शकतो. परंतु, शारदा घोटाळ्यात मिथून यांचे नाव आल्याने त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.  हा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठऱण्याची शक्यता आहे.