मुंबई (प्रतिनिधी) : ‘ग्लिडेन’ या फ्रेंच डेटिंग अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत केली आहे. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी या अ‍ॅपवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राशी चर्चा करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिले आहेत.

आमदार कायंदे म्हणाल्या की, ग्लिडेन या अ‍ॅपने भारतीय महिलांसह ६० कोटी लोकांचा सर्व्हे केला आहे. मूळात हा अ‍ॅप एक डेटिंग अ‍ॅप आहे. ६० टक्के महिलांपैकी ४८ टक्के महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात,  असे  या अहवालात  म्हटले आहे. ग्लिडेन या डेटिंग अ‍ॅपचा हा अहवाल महिलांची बदनामी करणारा आहे.  शेतकरी, कष्टकरी महिला आहेत. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिला आहेत. नेमकं महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी जो काही तथाकथित निष्कर्ष मांडला आहे. तो घृणास्पद आणि निंदनीय आहे. हे भारतीय महिला खपवून घेणार नाहीत. खोटारडा सर्व्हे असल्याने या अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कायंदे यांनी केली.