मावळत्या पदाधिकाऱ्यांची शहरातील विकास कामांबद्दल प्रशासकांशी चर्चा…

0
73

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महानगरपालिकेत असलेल्या प्रशासकीय कारकिर्दीमुळे मुळे सन 2021-22 चा महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून कादंबरी बलकवडे याच जाहीर करणार आहेत. अपेक्षित जमा महसूल आणि शहरातील प्रस्तावित विकासकामे यासह विविध योजनांसाठी महापालिकेतील मावळत्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याशी बैठक घेऊन आज (बुधवार) चर्चा केली.  

यावेळी शहरातील गावठाणमधील नवीन ड्रेनेज लाईनचा अमृत योजनेत समावेश करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. पाणीपुरवठा नळजोडणी खुदाईसाठी आकारण्यात येणाऱ्या रकमेत दरवर्षी वाढ होत असल्याने ही रक्कम प्रति मीटर 1,750 वरून 5,200 रुपये झाली आहे ती कमी करावी. झोपडपट्टीधारकांना घरफळा माफ करावा. थकबाकी धारकांना घरफाळा 7 ते 8 टप्प्यात  भरून घ्यावा. रंकाळा तलावाची पाणीपातळी कायम रहावी यासाठी नियोजन करावे. सानेगुरुजी वसाहतमध्ये सुरू असलेले  कोविड सेंटर आता बंद झाले आहे. त्या ठिकाणी मित्रांगण अपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी हॉस्पिटल  सुरू करावे  आणि  त्या ठिकाणी आरोग्य तपासणी सुरु ठेवावी.

तसेच अर्थसंकल्पातील ऐच्छीक  बजेटमधील कामे कमी खर्च करून पूर्ण करून घ्यावी. महापालिकेच्या गाळेधारकांचे भाडे रेडीरेकनरचा बेस  धरूनच स्थानिक पातळीवर कमी करण्याचा अधिकार आयुक्तांना मिळावा यासाठी प्रयत्न करावे. या बाबीवर चर्चा झाली प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन विकासाच्या कामासाठी प्राधान्य देऊ असे सांगितले.

माजी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास, स्थायी सभापती सचिन पाटील यांच्यासह अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविंद्र अडसूळ, सर्व विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.