मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. यामुळे आशियातील सर्वात मोठी कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. दरम्यान अवकाळी पाऊस, राज्य सरकारची धोरणे यामुळे पुन्हा नाशिक जिल्ह्यातच कांदा शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत हे दर आणखी खाली कोसळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी ज्या उच्च प्रतीच्या कांद्याला क्विंटलला तीन ते चार हजार रूपये भाव मिळत होता, तोच कांदा आज व्यापाऱ्यांकडून दीड ते दोन हजार रुपयांनी खरेदी केला जात आहे. यामुळे नाशिकमध्ये कांद्याचे दर गडगडल्याचे दिसत आहे. हा कांदा दर पडल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले होते; परंतु कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने याकडे कोण लक्ष देणार का? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.