दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल १०० डॉलरच्या जवळ पोहोचले होते; मात्र त्यानंतर आता कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू झाली आहे.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकार आणि इंधन कंपन्यांनी भारतीय ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. इंधन कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले असून त्यात कोणताही बदल झाला नाही. तर, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करातही कपात केली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा दर ८३.६३  डॉलर प्रतिबॅरल इतका होता, तर क्रूड ऑईलचा दर ७६.२८ डॉलर प्रतिबॅरल इतका झाला आहे. जवळपास दोन टक्क्यांची घसरण कच्च्या तेलाच्या दरात झाली आहे.