भुवनेश्वर : पैशांचा लोभ अतिशय वाईट… पैसा मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा असाच एक प्रकार ओडिशा अपघातानंतर उघड झाला आहे. पैशांच्या लोभापायी एका महिलेने स्वत:च्याच जिवंत पतीला मृत दाखवत मुर्दाड वृत्तीचे दर्शन घडवलंय. बनावट कागदपत्रे बनवून, ओडिशा येथील रेल्वे अपघातात आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे कटक येथील एका महिलेने घोषित केले. पैशांसाठी तिने हे हीन कृत्य केल्याचे उघड झाले.
गेल्या आठवड्यात ओडिशा येथील बालासोर येथे सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातात झाला. या अपघातात सुमारे 270 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आणि शेकडो प्रवासी जखमी झाले. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 17 लाख रुपयांची मदतीची घोषणा करण्यात आली होती.
मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाख रुपये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून 2 लाख रुपये आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या कार्यालयाकडून 5 लाख रुपये असे एकूण १७ लाख रुपये मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आरोपी महिलेला या पैशांची हाव सुटल्याने तिने तिचा पती मृत झाल्याचा दावा केला. त्यासाठी तिने बनावट कागदपत्रेही सादर केली आणि एक मृतदेह तिच्या पतीचाच असल्याचे सांगितले.
तिने जो पती मृत झाल्याचे सांगितले होते, तोच ‘जिवंत’ होऊन परत आला. विजय दत्त असे त्याचे नाव असून त्याने स्वतःच तिच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पत्नीने सादर केलेली कागदपत्रेही बनावच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पतीच्या तक्रारीनंतर ही महिला सध्या फरार असून, अधिकारी तिचा शोध घेत आहेत.
सरकारी पैसे हडप करण्याचा प्रयत्न आणि पतीच्या मृत्यूचा खोटा दावा केल्याबद्दल विजयने गीतांजलीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी रेल्वे आणि ओडिशा पोलिसांना मृतदेहांवर खोटे दावे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.