राशिवडे (प्रतिनिधी) : बाजारात पाचशेच्या बनावट नोटा हातोहात खपवल्या जात आहेत. आज करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील पाटील ऑटो पेट्रोल पंपावर चाणाक्ष कर्मचाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या एकाच पंपावर आज दिवसभरात बनावट नोटांच्या तीन घटना उघडकीस आल्या.

सणानिमित्त पेट्रोल पंप, बाजारपेठ अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडील नोटा गर्दीत सुद्धा तपासून घेण्याच्या शरद अतिग्रे या कर्मचाऱ्याच्या सवयीमुळे हा प्रकार उघडकीस आला.

पाचशेची नोट बनावट असल्याचे निदर्शनास आल्यावर त्या ग्राहकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ही नोट त्याच्याकडे कुठून आली, हे त्यालाच आठवत नसल्याचे त्याने सांगितले. बनावट नोटा खपवण्यासाठी यामागे मोठी यंत्रणा असण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन अशा प्रकाराची पाळेमुळे शोधून काढण्याची गरज आहे. आपल्याकडे बनावट नोट असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी न घाबरता ही नोट पोलिसांकडे जमा करणे आवश्यक आहे.