कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरी बाज असलेली ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका १६ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रक्षेकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये अंतरा व मल्हारची गोड प्रेमकथा साकारली आहे. अंतरा तिचं कुटुंब चालवण्यासाठी रिक्षा चालवते. ती भावनिक अशी आणि नात्याला विश्वास देणारी आहे.

अंतराची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाणने या मालिकेबद्दल सांगितले की, कोल्हापूरच्या रिक्षावालीची भूमिका करण्याची आव्हानात्मक संधी मला मिळाली. आता महिलाही रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्या महिलांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे. मालिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमध्ये अंतराची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे, असेही तिने सांगितले.

कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. तो भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. हे या मालिकेत पाहणे   रंजक ठरणार आहे.