न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतोय : शेट्टी

0
20

सांगली : केवळ सत्तेत असल्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात जावे लागणार, त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचाही विचार करा, असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भाजपला दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

सद्यस्थितीत राजकारणामध्ये कशा पद्धतीचा भाषेचा वापर करावा, कशी टीका टिपण्णी करावी, याचे कसलेही ताळतंत्र राहिलेले नाही. असंसदीय शब्द कसेही सर्रासपणे वापरले जातात, अशी स्थिती असली तरी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून न्यायालयाने ज्या तत्काळतेने शिक्षा सुनावली, ते संशयास्पद वाटत आहे. एकूणच न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्यासारखे असेच सामान्य लोकांना वाटते.

‘खालच्या स्तरावर जाऊन जातीय तेढच निर्माण होत जाईल, वांशिक भेद निर्माण होईल, हिंसा प्रवृत्त होईल, अशीच विधाने सातत्याने होत आहेत. लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व अशाप्रकारे रद्द करणे हे योग्य नाही, ते चुकीचेच आहे, असे माझे मत आहे,’ असे शेट्टी म्हणाले.

नुसते राजकारण करणे बाजूला ठेवा. या प्रकाराकडे पाहिल्यावर लोकशाहीवर एक प्रेम करणारा माणूस म्हणून आपल्याला खेद वाटतो. जे आज दुसऱ्यांवर दगड फेकत आहेत, ते लोक काचेच्या घरात राहतात. जर त्यांच्याकडे कोणी दगड मारला तर काचा फुटतात. तुम्ही आज सत्तेत म्हणून केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहात, पण आगामी काळात त्यांना विरोधी पक्षात बसावे लागेल, तेव्हा त्यांचे काय होईल, याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा शेट्टींनी दिली.