कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिका निवडणुकीत आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेनेने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे येथे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परिणामी शहरातील सर्वच ८१ वार्डात उमेदवारांची संख्या वाढणार असल्याने लढतही रंगतदार होईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपणार आहे. आता सभागृहाला केवळ सात दिवस शिल्लक राहिले आहेत. पण अजूनही निवडणुकीच्या पक्रियेला सुरूवात झालेली नाही. कोरोनामुळे निवडणूक लांबणार आहे. नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक राहील. दरम्यान, सभागृहाची मुदत संपण्याआधीच प्रमुख राजकीय पक्षात निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिकेत सत्तेत असलेले राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी बैठक घेतली. स्वतंत्रपणे लढणार, सर्व प्रभागात उमेदवार देणार, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा आदेश त्यांनी दिला आहे.

यावरून तूर्ततरी ते काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नाहीत, हे स्पष्ट होते. महापालिकेच्या सत्तेत काँग्रेससोबत असतानाही ते का राष्ट्रवादी म्हणून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या बाजूना सहकारी काँग्रेस पक्षाने कसे लढायचे याबद्दल अजून जाहीर भूमिका मांडलेली नाही. पण काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील हेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रभागनिहाय संपर्क वाढवला आहे.

शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हेही सक्रिय झाले आहेत. त्यांनी शनिवारी मेळावा घेवून महापालिकेवर भगवा फडकवणार, अशी घोषणा करून एकला चलोरेची भूमिका मांडली. यावरून सध्यातरी शिवसेनाही स्वतंत्र लढणार असे दिसते. भाजप स्वतंत्र लढेल. अशाप्रकारे निवडणूक रिंगणात चार प्रमुख पक्षाचे चार उमेदवार असतील. शिवाय प्रादेशिक पक्ष आणि अपक्षही रिंगणात राहतील. यामुळे सर्वच वार्डात उमेदवारांची गर्दी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया कधी लागायची त्यावेळी लागू दे, पण निवडणुकीची तयारी जोरात करायची, असेच चित्र इच्छुक आणि प्रमुख पक्षांमध्ये दिसत आहे.