नागपूर (वृत्तसंस्था) : भाजप अध्यक्ष नड्डा, अमित शाह यांनी मी सरकारमध्ये सामिल व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. पंतप्रधानांनीही यावर माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर मी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रीपद घेतले याचा मला कमीपणा वाटत नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव मीच भाजपच्या वरिष्ठांना दिला होता, असे सांगून फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील आणि मी सत्तेत सहभागी होणार नाही; मात्र त्यानंतर तासाभरात सर्व चक्रे फिरली आणि दिल्लीहून फोन येताच मी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी नेमके काय घडले? याबाबत सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच संदर्भात फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्या संमतीने हे प्रपोजल मी दिले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले पाहिजे आणि ते सर्वांनी मान्य केले. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन असेच ठरले होते. ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन पत्रकार परिषद झाली आणि ती करुन मी घरी गेलो. त्यावेळी नड्डा यांनी मला फोन करुन सांगितले की, तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले पाहिजे, असा माझा विचार आहे.

अमित शहादेखील माझ्याशी बोलले. त्यानंतर माझी तयारी त्यावेळेस नव्हती. कारण मी मानसिकता केली होती की, आपण बाहेर राहून या सरकारला मदत केली पाहिजे; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली आणि जे. पी. नड्डा यांनी तर जाहीरपणे सांगितले की, सरकारबाहेर राहून चालत नाही. सरकार चालवायचे असेल, तर सरकारमध्ये गेले पाहिजे. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करत मी निर्णय बदलला आणि उपमुख्यमंत्रिपदाची मी शपथ घेतली, असा फडणवीस यांनी या घटनेमागचा इतिहास सांगितला.