मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सत्तासंघर्ष आता मिटला आहे. फडणवीसांनी नाट्यमय घडामोडीनंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपद भूषवूनसुद्धा उपमुख्यमंत्रीसारखे कनिष्ठपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे पाचवे मुख्यमंत्री ठरले आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्याआधी चार नेत्यांनी कनिष्ठपद भूषवले आहे.

काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण हे १९७५  मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि वसंतदादा पाटील यांच्या जागी दोन वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९७८ मध्ये पाटील मंत्रिमंडळातील मंत्री असलेले शरद पवार हे सरकार पाडून मुख्यमंत्री झाले. पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारमध्ये शंकरराव चव्हाण अर्थमंत्री झाले.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी जून १९८५ ते मार्च १९८६ या काळात मुख्यमंत्री म्हणून काम केले. काही वर्षांनंतर त्यांनी सुशीलकुमार शिंदे सरकारमध्ये महसूलमंत्रीपद भूषवले. नारायण राणे शिवसेनेत असताना १९९९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एका वर्षापेक्षा कमी काळ त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. नंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते महसूलमंत्री झाले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण २००८  ते २०१०  दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २०१९ साली शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाममंत्री झाले.