कोल्हापूर (प्रतिनिधी) : पथविक्रेत्यांचा सर्व्हे करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही आता अंतिम मुदतवाढ असल्याने शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी सर्व्हेसाठी मुदतीत अर्ज द्यावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

महापालिकेने शहरातील पथविक्रेत्यांच्या सर्व्हेचे काम युध्दपातळीवर हाती घेतले असून यापूर्वी पथविक्रेत्यांचा सर्व्हे करण्यासाठी ३१ ऑक्टोंबरपर्यंत होती. मात्र पथविक्रेत्यांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.

आज शहरातील पथविक्रेत्यांची बैठक उप-आयुक्त निखिल मोरे यांनी घेऊन शहरातील सर्व पथविक्रेत्यांचा सर्व्हेची मुदत वाढवली असून पथविक्रेता सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे पथविक्रेता सर्वेक्षण होणार नसल्याने शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी सर्व्हेसाठी मुदतीत अर्ज द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीला उप-आयुक्त निखिल मोरे यांच्यासह सहायक आयुक्त संदिप घार्गे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, माजी महापौर आर.के.पोवार, अशोक भंडारे, किशोर घाटगे, राजेश महाडिक, रियाज कागदी, अविनाश उरसल, विजय नागावकर, नजीर देसाई यांच्यासह फेरीवाले संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.