नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर १ जानेवारीपासून टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य केली होती. परंतु आता १५ फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यासाठी चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केले होते. परंतु वाहन चालकांना फास्टॅग मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत फास्टॅग लावण्यास मुदत दिली आहे.

सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके कॅशऐवजी फास्टॅग लेनमध्ये रुपांतरीत केले जातील. जर एखादा वाहनचालक फास्टॅगशिवाय टोलनाक्यावर आला, तर त्याला दुप्पट टोल द्यावा लागेल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले होते. परंतु आता फास्टॅग घेण्यासाठी आणि लावण्यासाठी वाहन चालकांना मुदत दिल्याने दिलासा मिळाला आहे.