कुरुंद़वाड (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे नदीपात्रात पाणी वाढले आहे, याचाच फायदा घेत इचलकरंजी शहरातील काही कारखानदारांनी कारखान्यातील रसायनयुक्त दूषित सांडपाणी थेट पंचगंगा नदी पात्रात सोडले आहे. यामुळे पाणी प्रदूषित झाल्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्यूमुखी पडले असून तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे. दूषित पाणी आणि मृत झालेल्या माशांमुळे  पाण्याला उग्र वास येत असून पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

इचलकरंजी शहरातील सांडपाणी, कारखान्यांतील विना प्रक्रिया रसायनयुक्त प्रदूषित सांडपाणी पंचगंगा नदी पात्रात येत असल्यामुळे नदी प्रदुषित होत असते. उन्हाळ्यात याची तीव्रता अधिक जाणवते. नदी प्रदुषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी वारंवार आंदोलन होत असतात. त्यामुळे काही अंशी यावर अप्रत्यक्षपणे अंकुश असतो.

दरम्यान, गुरुवारी अचानक झालेल्या पावसामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. नदीपात्रात वाहते पाणी वाढत असल्याने काही कारखानधारकांनी रसायनयुक्त प्रदूषित सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने प्रदुषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्यूमुखी पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बंधाऱ्याला तटल्याने तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला.

प्रदुषित पाण्यामुळे पाण्याला फेस येत असून मृत माशांमुळे पाण्याला उग्र वास येत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.