सुळे-आकुर्डे बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात : ५ पिलर ढासळले

0
60

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील धामणी नदीवरील सुळे – आकुर्डे कोल्हापुरी बंधाऱ्याचा एक दगडी पिलर पूर्णत: ढासळला आहे. यापूर्वी ४ पिलर निकामी झाले आहेत. मागील ३ वर्षात बंधाऱ्यारी तिसऱ्यांदा पडझड झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून वाहतूक धोकादायक बनली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी दोन्ही बाजूला भराव टाकून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बंधाऱ्याचा वापर धामणी खोऱ्यातील सुळे, आकुर्डे, पणुत्रे, कोदवडे, गोगवे, वेतवडे या गावातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी केला जातो. बंधाऱ्याला सुमारे ५० वर्ष झाल्याने बंधारा कमकुवत बनला आहे. भिंतीला तडे गेल्याने पाणी गळती होत असल्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठवणूक होत नाही. त्याचा वापर फक्त वाहतुकीसाठी होत आहे.

बंधाऱ्याच्या १५ दगडी पिलर पैकी ९ पिलरची पडझड झाली आहे. तर ४ पिलर यापूर्वीच पडले आहेत. गतवर्षी एका बाजूचा पिलर खचला होता. पाटबंधारे विभाग तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेत आहेत. पावसामुळे नदीतून वाहत आलेले लाकडे, ओंडके, बांबूचे बेट, कचऱ्याचा ढीग बंधाऱ्याला तटल्याने दरवाजे बंद होऊन बंधाऱ्यावर पाण्याचा दाब वाढतो. त्याचा परिणाम दगडी पिलरवर झाल्याने पिलर ढासळण्याच्या स्थितीत आहेत.

बंधाऱ्याचा एक-एक पिलर निकामी होत आल्याने बंधाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वेळीच पाटबंधारे विभागाने व प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना तत्काळ करावी, अशी मागणी धामणी खोऱ्यातील नागरिक व वाहनधारकांतून होत आहे.

सुळे-आकुर्डे धरणासंदर्भात गेली १० वर्षे पाठपुरावा करीत आहे. तसेच लोकप्रतिनिधींना निवदनेही देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी संबंधित पुलाची दुरुस्ती व नवीन पुलासंदर्भात लवकर कार्यवाही करावी. सद्यस्थितीत बंधाऱ्याच्या पिलरची तत्काळ दुरुस्ती करावी. 

– सुरेखा बोगरे, पं. स. सदस्य, सुळे