कोल्हापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बालकांच्या हत्याकांड प्रकरणी  दोन बहिणींना  ठोठावलेली फाशी उच्च न्यायालयाने रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सीमा आणि रेणुकाच्या फाशीची शिक्षा उच्च न्यायालय आणि  सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती.  त्यानंतर  राष्ट्रपतींनी ही त्यांचा दयेचा अर्ज ७ वर्षांपूर्वी फेटाळला होता. परुंतु  त्यांच्या  शिक्षेची अंमलबजावणी झालेली नव्हती. यावर त्या दोघींनी उच्च न्यायालयात फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी  याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी झाली असता दोघी बहिणी गेली २५ वर्षे शिक्षा भोगत आहेत, असे नमूद करत  न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने या दोघींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मुळची नाशिकची असलेल्या अंजनाबाई गावित  आपल्या सीमा आणि रेणुका या दोन मुलीच्या मदतीने बालकांचे अपहरण  करून त्यांना ठार मारत होती.  कोल्हापूर जिल्ह्यात १९९० ते १९९६  या कालावधीत त्यांनी सुमारे ४३ बालकांचे अपहरण केले होते. त्यातील त्यांनी ९ मुलांना दगडावर आपटून ठार मारले होते.

हा खटला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी चालवला. या प्रकरणी कनिष्ट न्यायालयाने तिघीनाही फाशीची शिक्षा ठोठावली. दरम्यान, अंजनाबाई गावितचा कारागृहातच मृत्यू झाला. त्यानंतर सर्वोच न्यायालयाने २००६ मध्ये दोघा बहिणींची फाशी कायम ठेवली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. तो राष्ट्रपतीने २०१४ मध्ये फेटाळून लावला होता. त्यानंतर ७ वर्ष फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास सरकारला अपयश आले. अखेर उच्च न्यायालयाने त्या दोघींची फाशीची शिक्षा रद्द करून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.