गडहिंग्लजमधील घरफाळा माफ करा : मनसे

0
176

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरातील सर्व नागरिकांचा घरफाळा सरसकट माफ करावा. तसेच नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील सर्व गाळेधारकांचे बंद काळातील सहा महिन्याचे भाडे पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर यांच्याकडे करण्यात आली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात सर्व लोकांचे आर्थिक स्त्रोत बंद झाल्यामुळे सर्वजण मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी अजून पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. त्यामुळे घरफाळा माफ करावा. तसेच सदर थकबाकीच्या वसुलीसाठी पालिकेने कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली तसेच मूलभूत सुविधा बंद करण्याची भीती नागरिकांना दाखवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगले, प्रभात साबळे, अविनाश तशीलदार, प्राजक्ता पाटील, अमित चौगले, सचिन करडे, याशर उटी, मौनुद्दीन मुल्ला, अमृत चौगले, सतीश पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.