मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त एका गुजराती वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्तानंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सचिन वाझे प्रकरण, पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप यामुळे राज्यातील ठाकरे सरकारची कोंडी झाली आहे. त्यातच हे वृत्त समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.     

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी २६ मार्चला रात्री ९.३० वाजता अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतली. एका फार्महाऊसवर ही भेट झाली. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. यावरून शरद पवार आणि अमित शहा यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

दरम्यान, पवार आणि शहा यांचे भेटीचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल अहमदाबादमधून कुणालाही न भेटता थेट मुंबईला आले आहेत. यामागे भाजपचे षड्‌यंत्र असून अशी काही भेट झाल्याचे वृत्त निव्वळ अफवा आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट करून याबाबतच्या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे.