शिंगणापूर (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील शिंगणापुर येथील गणेशवाडी (आठ जणांचा माळ) येथे पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक सापडले आहे. येथे काही मुले खेळत असताना ते अर्भक त्यांच्या दृष्टीस आले. हे अर्भक अंदाजे एक ते दोन दिवसाचे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंगणापूर येथील गणेशवाडी भागानजीक आठ जणांचा माळ असं सामायिक क्षेत्र आहे. सध्या त्यामध्ये कोणतेही पीक नसून मोकळी जमीन आहे. आज सायंकाळच्या सुमारास तेथे काही मुले खेळत असताना एका चरीमध्ये त्यांना अर्भक असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लोकांना याची कल्पना दिली. एका नालासदृश्य चरीमध्ये पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत त्या ठिकाणी होते. अर्भक एक ते दोन दिवसाचे असण्याची शक्यता असून अर्भकाचा अर्धा भाग प्राण्याने खाल्लेला होता. अर्भका शेजारीच एक प्लास्टिकचे रिकामे पोते असल्यामुळे अर्भक पोत्यात घालून रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी टाकले असण्याची शक्यता वर्तवली जाते.

यावेळी पोलीस पाटील रवी जाधव, सरपंच प्रकाश रोटे, दत्तात्रय आवळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच हे अर्भक उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पुढील तपास करवीर पोलिस करत आहेत.