कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (मंगळवार) ‘लाईव्ह मराठी’ने एका विधवा वन मजुराच्या तक्रार अर्जाची बातमी प्रसारित केली होती. यामुळे वन विभागासह कोल्हापुरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी खुलासा करण्यासाठी ‘लाईव्ह मराठी’ने कोल्हापूर उपवनसंरक्षक रावसाहेब काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर चक्क मुलाखत देणार नसल्याचे सांगितले.

तर रावसाहेब काळे यांनी, या वादग्रस्त तक्रार अर्जासंदर्भात एका चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याच्याकडे या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, या संबंधितांना किती दिवसात न्याय मिळणार याबाबत कसलेही वक्तव्य त्यांनी केले नाही. एक विधवा वनमजूर आपल्या हक्काच्या मागणीसाठी गेले कित्येक महिने वन विभागाची पायरी झिजवत आहे. आता चौकशी अधिकारी असा कोणता अहवाल गेले कित्येक महिने तयार करीत आहेत हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणात जातीनिशी लक्ष घालून समाजातील सर्वात तळागाळाच्या लोकांना न्याय देणे अपेक्षित असते. मात्र, वन विभागातील काही अपप्रवृत्तींना समाजासमोर न आणता या विभागाची अब्रू राखण्याचा  प्रकार आहे का ? अशी चर्चा आता सुरू झाले आहे. तरी या वादग्रस्त तक्रार अर्जाची तातडीने निर्गती करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्तव्य असले पाहिजे. मात्र, या तक्रारीत विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांवर पुराव्यानिशी आरोप झाल्याने या प्रकरणात नको तितका वेळकाढूपणा संशयाच्या भोवऱ्यात येत आहे.