मुंबई  (प्रतिनिधी) : आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांतून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे,  असा खुलासा टोपे यांनी आज (शनिवार) केला आहे.

कंपनीने असमर्थता दाखविल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास झाला आहे. त्यासाठी मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.

गट- क आणि गट- ड अशा ६  हजार २०५ जागा भरण्यासाठी सरकारने मंजुरी दिली होती. या परीक्षेसाठी ८ लाख परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले आहेत. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ही दिले होते.  ही परीक्षा आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) होणार होती. मात्र, न्यासा संस्थेने  परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आणखी थोडा कालावधी लागेल,  असे कारण सांगितल्यामुळे ही परीक्षा रद्द करावी लागली . त्यानंतर विद्यार्थ्यांतून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.