माजी सैनिकांनी प्रवाहात सामील व्हावे : बी. एस. पाटील

0
26

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : माजी सैनिकांनी समाजाच्या प्रवाहात सामील होऊन त्यांच्या सुखदुःखासोबत समरस झाले पाहिजे तरच तुम्हाला मान प्रतिष्ठान मिळेल, असे स्पष्ट मत माजी सैनिक बी. एस. पाटील यांनी येथे व्यक्त केले.

आजी-माजी सैनिक समाज कल्याण मंडळ कुरुंदवाड (ता. शिरोळ) या संघटनेचा पहिला वर्धापन दिन मराठा मंडळाच्या सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी १९६२- १९६५ व १९७१ च्या युद्धामध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यांच्यासह आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

बी. एस. पाटील म्हणाले, मिलिटरीमध्ये असताना सैनिकांना सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या. आता आपण सेवानिवृत्त झालो आहोत. आपल्या परिवारासाठी व समाजासाठी माजी सैनिकांच्या न्याय हक्कासाठी अखेरपर्यंत लढा दिला पाहिजे. यासाठी माजी सैनिकांनी मानसिकता ठेवावी असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष संजय माने, कार्याध्यक्ष सुहास मुळीक, संघटक रमेश निर्मळे, सैनिक फेडरेशनचे शिरोळ तालुका अध्यक्ष दिनकर घाटगे, आजी-माजी सैनिक समाज कल्याण मंडळचे अध्यक्ष संजय इंगळे (शिरोळ), संभाजी पाटील, दत्तवाडचे बी. एन. रजपूत, गणेशवाडीचे लक्ष्मण पाटील, नांदणीचे दत्तात्रय चिवटे हे प्रमुख उपस्थित होते.

अमरवीर शंकर परीट (१९६२ भारत-चीन युद्ध) व अमरवीर संजयकुमार देसाई (१९८९- श्रीलंका शांतीसेना) यांच्या प्रतिमेचे पूजन उषा देसाई, उषा आवळे, अमृता बत्ते, अरुणा शितोळे, हौसाबाई खोत यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

१९६२, १९६५, १९७१ युद्धामध्ये सक्रिय सहभागी असलेले महालिंग औरवाडे, अशोक पाटील, गणपती जासूद, महादेव शिंदे, शिवाजी पाटील, अण्णासाहेब गायकवाड, भुपाल कडाळे, बाबू राजमाने, बाबूराव बदामे यांच्यासह कै. शंकर परीट यांचे नातू संदीप परीट यांचा, तर वीर पत्नी आनंदी शेवाळे यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आजी-माजी सैनिक समाज कल्याण मंडळ कुरुंदवाडचे अध्यक्ष कॅप्टन राजेंद्र देसाई, ऑ. कॅप्टन बी. एस. पाटील, सुभेदार संजय इंगळे, कॅप्टन रमेश निर्मळे, हवालदार संजय माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिव ऑ. सुभेदार मेजर कृष्णा आवळे यांनी केले. ऑ. कॅप्टन शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

यावेळी आजी-माजी सैनिक समाज कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश घेवडे, खजिनदार राजेंद्र चौगुले, संचालक सीताराम गायकवाड, रामचंद्र बत्ते, अशोक रामचंद्र पाटील, संचालिका लता पुजारी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील आजी-माजी सैनिक उपस्थित होते.