औरंगाबाद (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र,  यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला.  व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना?  अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज (शुक्रवार) औरंगाबादमध्ये आयोजित जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी  त्यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.