कोल्हापूर (प्रतिनिधी) : सडोली खालसा (ता.करवीर) येथे प्रभाग क्रमांक २ चे ईव्हीम मशीन बंद पडल्याने सकाळी एकच गोंधळ उडाला. सकाळी ७.३० वाजता मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने हा प्रकार लक्षात आला. विशेष म्हणजे संबंधित प्रभाग हा गावातील मोठा प्रभाग असल्याने येथे मतदारांची संख्या मोठी आहे. त्यात गावात यंदा पहिल्यांदाच तिरंगी लढत होत असल्याने मतदानासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे सकाळी ७.३० पासूनच मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार गर्दी करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा प्रकार घडल्याने मतदान अधिकाऱ्यांबरोबर उमेदवारही गोंधळून गेले आहेत.

मशीन बंद पडल्याचे समजताच पॅनल प्रमुख तत्काळ संबंधित केंद्राबाहेर आले आहेत. आजी माजी आमदारांचे गाव असल्याने गावातील निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सकाळचे ८ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान मशीन सुरु व्हायला अजून १ तास लागेल अशी माहिती संबधित सुत्रांकडून मिळाली आहे. मशीन सुरु व्हायला उशीर होणार हे ऐकताच काही मतदारांनी केंद्रावरून काढता पाय घेतला. तसेच चाकरमान्यांनी पुढील कामावर जायला उशीर होत असल्याने या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे उमेदवारांच्या जीवाची मात्र घालमेल सुरु आहे.