कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात असंतोषाचे पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडमधील एका तरुणाने आत्महत्या केली. यावर ‘मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा असून, हतबल होऊन तुम्ही आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटेल काय? त्यामुळे कोणत्याही बांधवांनी आत्महत्या करु नये.’ असे भावनिक आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे केले आहे.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्वत्र आंदोलने, मोर्चे निघत आहेत. दरम्यान बीडमधील एका मराठा तरुणाने मराठा आरक्षणासाठी काल (बुधवारी) आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक भावनिक ट्विट करुन कोणीही आत्महत्येचा पर्याय निवडू नये असे आवाहन केले आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतः च्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलिदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली. मराठा आरक्षणाची संघर्षाची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच सुरू राहील. आणि मला विश्वास आहे, की आपण नक्की जिंकू! दरम्यान युवकांनी आत्महत्या करू नये. माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का?’ असे भावनिक ट्विट खासदार संभाजीराजेंनी केले आहे.