वीज कनेक्शन टेंडर मंजुरीनंतरही आळते पाणी योजना प्रलंबितच…

0
140

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते या गावामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी योजना राबवली जात आहे. नदीवरील मोटारीला वीज कनेक्शन जोडण्यासाठी २०१९ मध्ये वीज कनेक्शनचे टेंडर मंजूर झाल्याचे समजते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे वीज कनेक्शनचा खर्च वाढल्याने काम झालेले नाही. परिणामी, गावाची पाणी योजना प्रलंबितच राहिली आहे.

वास्तविक वीज कनेक्शनचा नवीन प्रस्ताव पुणे विभागाकडे पाठवून तो पुन्हा  जिल्हा परिषदेकडे ४ नोव्हेंबर २०२० ला चौदा लाख पन्नास हजार रुपयांचे टेंडर मंजुरीसाठी आला. सदरचा पाणीप्रश्न त्वरित सुटावा यासाठी आळते ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार  ४ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा परिषदेने टेंडरचे अधिकार त्यांना दिले. पण अजूनही ग्रामपंचायतीकडून वीज कनेक्शन टेंडरच काढण्यात आल्याचे दिसत नाही. या संदर्भात सरपंच आणि ग्रामसेवक यांना विचारले असता टेंडर घ्यायला ठेकेदार पुढे येत नसल्याचे कारण देत काही दिवसांत सभा घेऊन हा प्रश्न निकालात काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले. हे कारण जरी त्यांनी दिले असले, तरी ग्रामपंचायत पातळीवरच ही प्रक्रिया रखडल्याचे स्पष्ट होत आहे.

अचानक जर वळवाचा पाऊस पडला तर शेतीमधून हे काम करायला मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे काम रखडल्यास फेर प्रस्ताव दाखल करावा लागेल. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार टेंडर देऊनही वेळ लागत असल्यामुळे राजकीय दबावामुळे टेंडर भरायला कोण तयार होत नाही का, अशी शंका उपस्थित होत आहे.