गोकुळ निवडणूक : महाडिकांच्या भेटीनंतरही आवाडेंची भूमिका गुलदस्त्यात…

0
928

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. सत्तारूढ आघाडीचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज (मंगळवार) इचलकरंजी येथे जाऊन आ. प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. पण त्यांच्या भेटीतून अद्याप तरी काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. प्रकाश आवाडे यांनी ‘गोकुळ’बाबत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवून उत्सुकता वाढवली आहे. प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत आणखी बैठक होण्याची शक्यता असल्याचे ‘लाइव्ह मराठी’च्या प्रतिनिधीला सांगितले.

गोकुळमध्ये सत्तारूढ आघाडीची सत्ता राखण्यासाठी आघाडीचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक हे जोडण्या लावण्यासाठी सातत्याने फिरत आहेत. विरोधी आघाडीच्या गळाला न लागलेल्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज महाडिक इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी गेले. त्यांच्यासह माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.

पण आ. प्रकाश आवाडे यांनी मात्र गोकुळसाठी पाठिंबा देण्याबाबत कोणताही शब्द दिला नसल्याचे समजते. याबाबत आवाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘गोकुळ निवडणुकीबाबत फक्त चर्चा झाली असून अद्याप निर्णय कोणताही झालेला नाही. आणखी चर्चा करण्यासाठी बैठक घेणार, त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे’, त्यांनी स्पष्ट केले.